Thursday, September 20, 2012


01 जुलै, 2012
वसंतराव नाईक यांना अभिवादन

          अमरावती, दि. 1 हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्य जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जयंत अपाले यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हारअर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा नाझर दिलीप देवळे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            उपस्थितांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक
यांना आदरांजली
अमरावती, दि. 1  हरित क्रांतीचे प्रणेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यांच्या  जयंतीनिमित्य  विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.
            विभागीय आयुक्त कार्यालयातील या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. कार्यक्रमाचे नियोजन नाझर दिनेश बढिये यांनी केले.
00000

आगप्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत
अग्निशमन उपकरणाचे प्रात्यक्षिक

            अमरावती, दि. 1  अचानक आग लागल्यानंतर अनेकजण भांबावून जातात.  आगनियंत्रणासाठी काय करावे तेही बरेचदा सुचत नाही. अग्निशमन यंत्र उपलब्ध असले तरी ते हाताळण्याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे आगीमध्ये नुकसान होते. असे नुकसान आगनियंत्रित करुन टाळता आले पाहिजे त्याकरीता कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण यंत्राबद्दल माहिती व ते हाताळण्याचे कौशल्य साधता यावे, या संकल्पनेतून विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी अमरावती महापालिकच्या अग्निशमन पथकाव्दारे अग्निशमन उपकरण हाताळण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
आयुक्त कार्यालयाच्या परिसरात काडीकचरा एकत्र गोळा करण्यात आला त्याला आग लावण्यापूर्वी अग्निशमन यंत्राच्या उपकरणाची माहिती उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी मनपा अग्निशमन विभागाचे वरिष्ठ फायरमन भरतसिंग चव्हाण म्हणाले की, आग लागल्यानंतर ती पसरण्याआधिच प्रथमोपचार म्हणून या अग्निशमन उपकरणाचा वापर केला जातो.  हे उपकरण सहज हाताळता येण्याजोगे आहे.  A,B,C,D  नोंद असलेले अग्निशमन यंत्र हे सर्वप्रकारच्या आगीला नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सिध्दार्थ भोतमांगे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की,  A मध्ये लाकूड, कार्बन, कागद याची लागलेली आग विझविणारे घटक आहेत.  B मध्ये पेट्रोल, डिझल वा इतर द्रव्य पदार्थामुंळे लागणाऱ्या आगीला नियंत्रित करणारे घटक आहेत.  C मध्ये गॅस, वायू गळती आदिमुळे लागलेली आग नियंत्रित करणारे घटक आहेत. आणि D  हा घटक  धातू, फॉस्फोरस आदिच्या आग नियंत्रणाचे काम करतो. रासायनिक प्रक्रियेत इंधन, प्राण वायू, उष्णता यांचा संयोग आला म्हणजे आग लागते. अशी माहितीही श्री. भोतमांगे यांनी दिली.
अग्निशमन विभागाचे सैय्यद अन्वर यांनी आग लागल्यानंतर कोणती दक्षता घ्यावी. याबाबतची माहिती दिली.  यावेळी सहयोगी प्राध्यापक सुधिर राठोड यांनी अग्निशमन यंत्र वापरण्याचे PASS हे सूत्र समजावून सांगितले. P म्हणजे पीन काढणे, A म्हणजे ऐम द नोझल,  आग जेथून लागली त्या वस्तूकडे नोझल वळविणे, नोझल ज्वालांकडे फिरवू नये, S म्हणजे अग्निशमन यंत्राची कळ दाबणे आणि दूसरा S म्हणजे आग जेवढ्या क्षेत्रात पसरली आहे तेथे ते फिरविणे असे सांगितले. यावेळी अग्निशनम दलातील फायरमन विशाल पिंपळे यांनीही उपस्थितांना उपयुक्त माहिती दिली.
यानंतर गोळा करण्यात आलेल्या काडीकचऱ्याला आग लावून ती अग्निशमन उपकरणाव्दारे विझविण्याचे  प्रात्यक्षिक करुन दाखविले. या प्रात्यक्षिकानंतर कर्मचाऱ्यांकडून अग्निशमन यंत्र हाताळण्याचा प्रयोग करण्यात आला. या प्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
00000

30 जून, 2012
राणीगाव येथे राहील कृषी सेवा केंद्रात
खताचा अवैध साठा जप्त

* भरारी पथकाची कारवाई
* पोलीसात फौजदारी गुन्हा दाखल
* 650 खताच्या नमुन्याची तपासणी
* 50 कृषी केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश
* 50 कृषी केंद्राचे परवाने रद्द

अमरावती, दि. 30   धारणी तालुक्यातील राणीगाव येथील राहील कृषी सेवा केंद्रात विभाग व जिल्हा स्तरीय भरारी पथकाने धाड टाकुन 8.80 मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा जप्त केला. यासंदर्भात संबंधित कृषी सेवा केंद्राचे संचालक मोहमद अमिन अब्दुल मजिद व  त्याच्या एका साथीदारावर पोलीस स्टेशन धारणी येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकऱ्यांची फसवणुक होऊ नये त्याला योग्य दरात बी- बियाणे, खत उपलब्ध होत आहे किंवा नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभाग व जिल्हा स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ज्या कृषी केंद्रात बी-बियाणे, खताचा काळा बाजार होत असेल त्या दुकानदाराविरुध्द कठोर करवाई करण्याचे निर्देश विभागीय कृषी सह संचालक अशोक लोखंडे यांनी या पुर्वीच सर्व भरारी पथकांना दिले.
त्याअनुषंगाने भरारी पथकाचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) एल.जी. आडे यांच्या नेतृत्वात मोहीम अधिकारी डी.ओ. काकडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी.ए. कडु, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस.एस. इंगोले यांनी राहील कृषी केंद्रात रासायनिक खताचा अवैध साठा सापडल्याबद्दल कृषी केंद्राच्या संचालकाविरुध्द वरीलप्रमाणे कारवाई केली. या कारवाईत युरिया 140 बॅग, 20:20:0 खताच्या 33 बॅग, 12:32:06 खताच्या 03 बॅग अशा एकूण 67 हजार रुपये किमतीचा अवैध रासायनिक खताचा साठा जप्त केला. सदर कारवाई ही अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत रासायनिक खते नियंत्रण आदेश 1995 नुसार करण्यात आली असुन या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे.
याशिवाय या परिसरात तीन कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली असून काही त्रुटी आढळल्यामुळे या तीनही कृषी केंद्रांना भरारी पथकाने विक्री बंदीचे आदेश दिले आहेत.
आतापर्यंत विभागात भरारी पथकाच्या माध्यमातून रासायनिक खताचा अवैध साठ्याच्या तीन प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती आणि यवतमाळ येथे या भरारी पथकाने कारवाई केली. तसेच आतापावेतो विभागात 650 रासायनिक खताचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये 50 कृषी केंद्रांना विक्री बंदीचे आदेश देण्यात आले.
59 परवाने रद्द
        कृषी विभागाच्या विभाग व जिल्हा स्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाकडून बी-बियाणे व खताचा काळा बाजार रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. रासायनिक खताच्या संदर्भात परवाने रद्द करण्याची कारवाई देखिल करण्यात येत असुन आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात 49 आणि अकोला जिल्ह्यात 10 अशा एकुण 59 कृषी केंद्रावर परवाने रद्द करण्याची कारवाई भरारी पथकांनी केल्याची माहिती कृषी विभागाव्दारे देण्यात आली आहे.
00000

राधाकृष्ण विखे पाटील
2 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

अमरावती, दि. 30   राज्याचे कृषी व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोमवार दिनांक 2 जुलै, 2012 रोजी अमरावती जिल्‍ह्याच्या दौऱ्यावर येत असुन सोमवार दिनांक 02 जुलै, 2012 रोजी दुपारी 3.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित होणाऱ्या खरिप हंगाम व टंचाई परिस्थितीबाबत आढावा बैठकीस उपस्थित राहतील.
सांयकाळी 6.30 ते 8.30 हा वेळ राखीव. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून बडनेराकडे प्रयाण व राखीव. रात्री 9.30 वाजता नागपूर पुणे एक्सप्रेसने कोपरगाव जि. अहमदनगरकडे प्रयाण करतील.
00000

आज मासोद येथे एनसीसी छात्रांचे शिबीर
·         शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांची माहिती

अमरावती, ‍िद. 30   विकास योजनांचे विविध उपक्रम राबविण्यासाठी एनसीसीने मासोद या गावाला दत्तक घेतले आहे. अमरावतीपासुन जवळच असलेल्या मासोद येथे रविवार दिनांक 01 जुलै, 2012 रोजी सायंकाळी 5 वाजता कृषी दिनानिमित्त फोर महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराला महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाचे सदस्य ॲड. डॉ. धनश्याम ढोले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या प्रसंगी डॉ. ढोले शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहे तरी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फोर महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग कमान अधिकारी यांनी केले आहे.
00000

29 जून, 2012
जीवनात यशस्वीतेसाठी शिस्त व वेळेच बंधन अनिवार्य
-          जिल्हाधिकारी

अमरावती, दि. 29   आई-वडीलांचा छत्र हरपलेल्या अश्या निराधार मुलींनी आपल्या जीवनात उत्तुंग भरारी व यशस्वीतेसाठी शिस्त व वेळेचे बंधन पाळणे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी केले.
            गाडगेनगर येथील शासकीय मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील मुलींना जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांचे हस्ते वस्त्र वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास उपआयुक्त माधव बोरखडे, महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके, डॉ. कल्पना भंडारी, डॉ. रोमा बजाज, गोविंद भाऊ कासट, अधिक्षिका श्रीमती एस.आर. गिधेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
            आयुष्यात वेळेचे बंधन व शिस्त लावण्याचा सातत्याने प्रयत्न करावा असे सागून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, वेळेवर जेवण, अभ्यास, व्यायाम, वेळेवर झोपने, प्रार्थना असे आवडीचे छंद प्रामाणिकपणाने केल्यास हमखास यश प्राप्त होतो. तसेच आपले भावी जीवन यशस्वी होते.  स्वत:ची कामे करुन जगण्याची उमेद ठेवावी व अडचणीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा. दुख सर्वांच्या आयुष्यात येत असतात त्या दु:खाच्या  समोरे जाऊन मार्ग काढणे हे आपले कर्तव्य समजून पुढे जाण्याचा प्रयत्न सदैव प्रयत्न करावा. चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, अधिकारी व इंजिनिअर व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी व्यक्त केली.
            शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहात 11 जिल्ह्यातील 52 मुली राहतात. त्यांना शासनाकडून व सेवाभावी संस्थेकडून आर्थिक मदत मिळते. निरीक्षण गृहातील 10 वी वर्गात प्रथम क्रमांक पटकाविणारी                कु. सोनाली व कु. अनुसया पाटील यांना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास निरिक्षण गृहातील अधिकारी, कर्मचारी व निरिक्षण गृहातील निराधार मुली उपस्थित होते.
00000

भ्रूणहत्या थांबविण्यासाठी एमटीपी व सोनोग्राफी
 सेंटर तपासणीला गती द्या
-          गणेश ठाकूर

* राखी पौर्णिमेच्या दिवसापासुन गावात भ्रूणहत्येबाबत जनजागृती
* बोगस डॉक्टरांची शोध मोहिम सुरु करण्याचे निर्देश
* लेक वाचवा मोहिमेसाठी समिती गठीत करणार
* विभागात 362 सोनोग्राफी व 398 एमटीपी सेंटर

अमरावती, दि. 28   गर्भधारणापुर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र लिंग निवडीव्दारे निदान झाल्यानंतर होणाऱ्या भ्रूणहत्या थांबविण्यासाठी एमटीपी व सोनोग्राफी सेंटर तपासणी मोहिमेला गती द्या, असे निर्देश विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी दिलेत.
आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयुक्त गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गर्भधारणापुर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र लिंग निवडीस  प्रतिबंध कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, अन्न व प्रशासन औषधचे सहायक आयुक्त गिरीष हूकरे,      उप आयुक्त अशोक शुक्ला, डॉ. के.जी. अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्स्यक डॉ. राऊत, मनपाचे डॉ. राठी,    डॉ. प्रिती वैरागी, ॲड. श्रध्दा वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.
भ्रूणहत्या थांबविण्यासाठी राखी पौर्णिमेच्या दिवसापासुन गावागावात जनजागृती मोहिम हाती घ्यावी व  लेक वाचवा मोहीम राबविण्यासाठी एक समिती गठीत करावी तसेच बोगस डॉक्टरांची शोध मोहीम पुन्हा सुरु करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त गणेश ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.
प्रत्येक तालुक्यातील  1 व शहराच्या 4 ठिकाणी असलेल्या सोनोग्राफी  सेंटरची तपासणी करावी व दिलेले उद्दिष्ठ पुर्ण करावे असे सांगून आयुक्त पुढे म्हणाले की, महापालीका क्षेत्रात या कामाला गती देण्याची गरज आहे. त्यामुळे महापालीका क्षेत्रातील सोनोग्राफी सेंटरचे काम तातडीने सुरु करावे. भ्रूणहत्या  थांबविण्याची जबाबदारी डाँक्टरांची आहे. डॉक्टरांनी या कामाला गती देण्याबाबतही योग्य ती काळजी घेण्याचेही आयुक्तंनी यावेळी सुचिविले.
      जिल्ह्यात भ्रूणहत्या थांबविण्यासाठी एमटीपी व सोनोग्राफी सेंटर तपासणीची कामे फार अल्प प्रमाणात असून या कामाला डॉक्टरांनी जलद गतीने पूर्ण करावे, असे आयुक्त गणेश ठाकूर यांनी सांगितले.
      या बैठकीत आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गर्भपात केंद्राबाबतची माहिती जाणून घेतली तसेच फोर डी. मशीन कुठे कुठे उपलब्ध आहे याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्यात. एक किंवा दोन अपत्यानंतर गर्भधारणा राहीलेल्या महिलेनी गर्भपात केला किंवा कसे याबाबतची माहिती घेऊन त्याचा तपशीलवार नोंदी ठेवण्यात.
विभागात अमरावती जिल्ह्यात  108, अकोला 75, यवतमाळ 70, बुलडाणा 77 व वाशिम 32  असे एकूण 362 सोनोग्राफी सेंटर आहेत. यापैकी तपासणी झालेल्या सोनोग्राफी सेंटरची संख्या 08  तसेच जिल्ह्यात 119, अकोला 95, यवतमाळ 69, बुलडाणा 89 व वाशिम 26 असे एकुण 398 एमटीपी सेंटर असुन तपासणी झालेल्या एमटीपी सेंटरची संख्या 14 असल्याचे आयुक्त गणेश ठाकूर यांनी सांगितले.
00000

मुख्य वन संरक्षकांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सत्कार

अमरावती, दि. 29   मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा व्याघ्र प्रकल्प असुन येथील जैव विविधतेसाठी तसेच उंच सखल भौगोलिक स्थितीमुळे सु विख्यात आहे. 2027 वर्ग किलो मिटर इतके विस्तीर्ण क्षेत्र असल्यामुळे येथील व्यवस्थापन, संरक्षण ही कामे, शिकार, अवैध चराई, अतीक्रमण, चोरटी लाकुड तोड इत्यादी संभावीत धोके लक्षात घेता अत्यंत जिकरीचे आहे. अशा परिस्थितीत सुध्दा शासनाने जारी केलेल्या रेड अलर्ट च्या काळात जिवाची पर्वा न करता शिकारीच्या टोळीस पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सत्कार मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्रसंचालक यांचे हस्ते दिनांक 22 जून, 2012 रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह संकुलात सर्व क्षेत्रीय कर्मचारी/अधिकारी यांचे उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी चौराकुंड परिक्षेत्रातील वनरक्षक ओंकार शेळके व महिला वनरक्षक कु. एल. एस. चतुर त्याच प्रमाणे W.R.C.S चे प्रतिनीधी तुषार पवार यांना मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान मधून प्रत्येकी 5 हजार रुपयाचा धनादेश शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे त्यांचे सोबत असलेले वनमजुर दलसिंग धुर्वे व छोटेलाल यांना प्रत्येकी 2 हजार 500 रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
      या प्रसंगी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक के.पी. सिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, वन्यजीव संरक्षण हा फक्त नोकरीचा भाग नसुन ती बांधीलकी म्हणुन स्विकारली पाहीजे. अशा उपक्रमातून  क्षेत्रीय कर्मचाऱ्यात उत्साह निर्माण होईल अशी ही अपेक्षा सुध्दा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास व्याघ्र प्रकल्पातील सिपना व आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक श्री.युवाराज, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक भुतडा व आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक श्री. गोडबोले सहाय्यक वनसंरक्षक तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संशोधन अधिकारी देवकिशोर गडपांडे यांनी केले.
00000
वृत्त क्र :  112
अपात्र शिधापत्रिकाधारकांनी
 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

* अपात्र शिधापत्रिकधारकांना विशेष संधी

अमरावती, दि. 29   सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचा लाभ शिधापत्रिका रद्द झालेले लाभधारक घेऊ शकत नाही अशा अपात्र ठरवून रद्द केलेल्या शिधापत्रिका पुन्हा पात्र करण्यात येणार आहे. 01 मार्च ते 31 ऑगस्ट, 2011 या कालावधीत अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम अंतर्गत ज्या शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिका विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर न केल्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या केवळ अशा शिधिपत्रिकाधारकांसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरुन देण्यासाठी  दि. 15 ऑगस्ट, 2012 ही विशेष संधी देण्यात येत आहे. या संधीचा फायदा म्हणून अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांनी आवश्यक त्या पुराव्यासह विहित नमुन्यातील अर्ज भरुन जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न, धान्य वितरण अधिकारी, तहसिलदार, उपनियंत्रक, शिधावाटप व इतर सर्व अधिकारी यांच्याकडे  15 ऑगस्ट, 2012 पूर्वी जमा करावे असे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर. चांदुरकर यांनी प्रसिध्दीपत्रकव्दारे कळविले आहे.
00000

साठवलेले धान्य खराब होणार नाही
यासाठी गोडाऊन सुस्थितीत ठेवा
- जिल्हाधिकारी
अमरावती, दि. 29    जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरीत करण्यात येणाऱ्या गोडाऊनमध्ये साठवलेले गहू, तांदुळ खराब होणार नाही याची अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन गोडाऊन सुस्थितीत ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
            मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना पावसाळ्यात स्वस्त धान्य दुकानातून धान्य व्यवस्थितरित्या मिळावे यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत बीपीएल, एपीएल, अंत्योदय शिधापत्रिकधारकांना 100 टक्के धान्य मिळेल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.         
केरोसिन वितरकधारक वरुड येथील वानखडे एजन्सी, अंजनगाव सुर्जी येथील ओम करोसिन एजन्सी अचलपूर येथील कच्छप व बी.ए. मर्चंट या वितरकांनी 30 जून, 2012 पर्यंत केरोसीनसाठ्याची उचल करण्याबाबत सुचविण्यात आले. 
            जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीस अपर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, समितीचे सन्मानीय सदस्य भैय्यासाहेब ठाकरे , श्रीमती गीता दंडाळे, भुषण बनसोड व जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले उपस्थित होते.
00000
           


            

28 जून, 2012
1 जुलै रोजी होणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या
पदभरती परिक्षेच्या सात  केंद्रात बदल
* स्टाफ सिलेक्शन परिक्षेमुळे केंद्रात बदल

अमरावती, ‍दि. 28   पशुसंवर्धन विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 1 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी पुर्वी निश्चित केलेल्या सात परिक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात येत आहे. याचदिवशी स्टाफ सिलेक्शन परिक्षा असल्यामुळे या सात केंद्रामध्ये हा बदल करण्यात येत  आहे. नवीन सुधारित परिक्षा केंद्र ठळक अखरात अधोरोखित केले असुन, कंसामध्ये पुर्वीच्या परिक्षा केंद्राचे नाव देण्यात येत आहे. या बदलाची नोंद संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती  यांनी केले आहे.
केंद्र क्रमांक 602 जिल्हा परिषद (मा.शा) उर्दू कन्या शाळा होटल महफील इन हॉटेलच्या बाजुला, कॅम्प, अमरावती (पुर्वीचे केंद्र रुरल इन्स्टिट्यूट स्वतंत्र कनिष्ट महाविद्यालय, पंचवटी चौक, अमरावती) केंद्र क्रमांक 603 जिल्हा परिषद (मा.शा) कन्या शाळा, कॅम्प, अमरावती (पुर्वीचे केंद्र शासकीय तंत्रनिकेतन गाडगे नगर, अमरावती) केंद्र क्रमांक 604 न्यू हायस्कूल मेन, जोग चौक, अमरावती (पुर्वीचे केंद्र श्री. रामकृष्ण क्रीडा विद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती) केंद्र क्रमांक 609 ज्ञानमाता हायस्कुल, इर्विन चौक, अमरावती       (पुर्वीचे केंद्र होलीक्रॉस मराठी हायस्कुल, इर्विन चौक, अमरावती) केंद्र क्रमांक 610 नारायणदास लढ्ढा हायस्कुल, बियाणी चौक, अमरावती (पुर्वीचे केंद्र मनीबाई गुरजराथी हायस्कुल, अंबापेठ, अमरावती) केंद्र क्रमांक 611 माहेश्वरी कन्या विद्यालय, धनराज लाईन, अमरावती (पुर्वीचे केंद्र समर्थ हायस्कुल, दवरणकर नगर, अमरावती) केंद्र क्रमांक 612 व 613 जिल्हा परिषद (मा.शास) शाळा सायंस्कोर मैदान, बसस्टँन्ड जवळ, अमरावती (पुर्वीचे केंद्र होलीक्रॉस इंग्लिश हायस्कुल इर्विन चौक, अमरावती)
या परिक्षेसाठी निश्चित करण्यात आलेले परिक्षा केंद्र क्रमांक 601, 605, 606, 607 व 608 या केंद्रामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सदर परिक्षा या केंद्रावरच घेण्यात येईल. या बाबीची नोंद सुध्दा उमेदवाराने घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
00000

उत्पादन वाढीसाठी बिज प्रक्रिया
केलेले बियाणे वापरा
- विभागीय कृषि सहसंचालक
* तृणधान्य पिकासाठी ॲझोटोबॅक्टर
* डाळ वर्गीय पिकासाठी रायझोबियम चा वापर

अमरावती, दि. 28   जमिनीतून व बियाणाव्दारे पसरणारे रोग व किडींचा पिकांवरील प्रादुर्भाव कमी करुन पिकांची जोमदार वाढ व अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी बिजप्रक्रिया हा कमी खर्चाचा उपाय असुन शेतकऱ्‍यांनी बिजप्रक्रियेचे महत्व लक्षात घेऊन बिज प्रक्रिया केलेले बियाणेच वापरावे असे आवाहन विभागीय कृषि सह संचालक अशोक लोखंडे यांनी केले आहे.
शेतकरी सर्वसाधारणपणे विविध कंपन्याचे बियाणे बाजारातून विकत घेऊन पेरणी करतात ते बियाणे कंपनीकडून औषणाची प्रक्रिया केलेले असते. मात्र जे शेतकरी स्वत:जवळचे बियाणे पेरणीसाठी वापरतात त्या बियाण्यावर बिज प्रक्रिया केलेले नसल्यामुळे पिकावर बियाण्यामार्फत तसेच जमिनीतून परसरणाऱ्या किड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
बियाण्यामार्फत पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ जोमदारपणे होत नाही. त्यामुळे उत्पन्नही घटते. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी औषधांसोबतच तृणधान्य पिकांकरीता ॲझोटोबॅक्टर व डाळ वर्गीय पिकासाठी रायझोबियम या जमिनीतील नत्र पिकांना उपलब्ध करुन देणाऱ्या व पीएसबी यास स्पुरद उपलब्ध करुन  देणाऱ्या जिवाणूंच्या वापरामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पादनात हमखास भरघोस वाढ होते. या बिज प्रक्रियेचे महत्व ओळखून शेतकऱ्यांनी 100 टक्के प्रक्रिया केलेले बियाणे वापरणे हितकारक आहे. बिज प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
00000

27 जून, 2012
पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात
37 (1) व (3) कलम जारी

अमरावती, दि. 27  अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त सुरेशकुमार साखरे यांनी 07 जुलै, 2012 च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस कायदा 1991 च्या कलम 37 अन्वये अधिसुचना व कलम 37 (3) अन्वये  प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
26 जुन, 2012 पासुन या कलमाची अंमलबजावणी करण्यात येत असुन 26 जुन ते 07 जुलै, 2012 या कालावधीमध्ये बालवाडी, अंगणवाडी संघटनेच्यावतीने धरण, आंदोलन 01 जुलै रोजी नगरसेवक बाजड यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन 02 जुलै रोजी शासनाच्या विरोधात सर्व खाजगी शाळा बंद आंदोलन तसेच बी-बियाणाचा होणारा काळा बाजार यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून प्रक्षोप आणि राजकीय पक्ष संघटना आदींतर्फे होणारे आंदोलन विचारात घेऊन मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) व (3) जारी करण्यात आले आहे.
            उपरोक्त कलामांतर्गत मनाई करण्यात आलेल्या बाबीचे कोटेकोरपणे पालन करण्यात यावे. इत:पर या कलमातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
00000

अनधिकृत औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेऊ नका
* डीजीइटी संलग्नता प्राप्त संस्थेतच प्रवेश घ्यावा

अमरावती, दि. 27   कोणत्याही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील व्यवसाय तुकडीस केंद्र सरकार डीजीइटी नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त नसेल तर अशा अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एस.एम. हस्ते यांनी केले आहे.  अशा अनधिकृत औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी अथवा त्याच्या पालकाची राहील यांची नोंद घ्यावी, असेही सहसंचालकांनी कळविले आहे.
केंद्र सरकार डीजीइटी नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त नसलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील व्यवसाय तुकड्यांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेला बसता येणार नाही याबाबतची जबाबदारीही संबंधित विद्यार्थी, पालक व त्या संस्थेची राहील. शासन याबाबत जबाबदारी राहणार नाही याचीही नोंद घ्यावी.
संलग्नता प्राप्त संस्था/केंद्राची यादी संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, संबंधित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
www.dvet.gov.in या संकेतस्थळावर विभागीय कार्यालय तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे पत्ते संचालनालयाच्या उपलब्ध आहे.
00000

वृत्त क्र :  105
वैध मापन शास्त्र यंत्रणेव्दारे विभागात
1 कोटी 86 लक्ष रुपयाचा महसुल
* उद्दिष्टापेक्षा 6 लक्ष 11 हजार 692 रुपये अधिक वसुली

अमरावती, दि. 27   सन 2011-12 या आर्थिक वर्षात पडताळणी व मुद्रांक‍ शुल्क वसुलीसाठी अमरावती विभागाला 1 कोटी 80 लाख रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र या उद्दिष्टाच्या तुलनेत 6 लाख 11 हजार 692 रुपये अधिक वसुली करुन या आर्थिक वर्षात या विभागाने शासनाला 1 कोटी 86 लक्ष 11 हजार 692 रुपये इतका महसुल वसुल करुन दिला अशी माहिती अमरावती विभागाचे वैध मापन शास्त्र उपनियंत्रक दा.ग. पराते यांनी एका प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.
            वैध मापन शास्त्र अधिनियमन 2009 व वैध मापन शास्त्र (आवेष्टित वस्तु) वजने मापे तसेच आवेष्टित वस्तु विषयक 3 हजार 830 प्रकरणे नोंदविण्यात आली. त्याव्दारे 63 लाख 9 हजार 125 इतकी प्रशमन शुल्क गोळा करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक व नियंत्रक वैध मापन शास्त्र डॉ. माधव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मापे व तोलन उपकरणे इत्यादींची फेरपडताळणी व मुद्रांकन न करुन घेणे, उत्पादक, आवेष्टक व आयातदार यांनी आवेष्टित केलेल्या वस्तुवर उत्पादकाचा सविस्तर पत्ता नसणे, महिना व वर्ष, कंझ्युमर केअर नंबर नसणे, छापील मुळ किंमतीवर अधि‍क किमतीचे स्टिकर लावणे तसेच घोषित मुळ किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणे या बाबींचा समावेश असुन खते, बी-बीयाणी, किटकनाशके याव्यतिरीक्त वेगवेगळ्या मोहिमेंतर्गत प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी सहायक नियंत्रक आ.बा. पवार, ज.स. सुर्वे (अमरावती), ग.सा. ढाले (यवतमाळ), सु.वि. शिंदे (अमरावती), अ.बा. कापर्तीवर (अकोला), आर.बी. बांगर (बुलडाणा) तसेच विभाग पातळीवरील सर्व निरीक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.
00000

मादक द्रव्यापासून होणारी हानी टाळा

* जागतिक अमली पदार्थ विरोधीदिन साजरा
* एनसीसी विद्यार्थ्यांनी केली रॅलीव्दारे जनजागृती

अमरावती, दि. 27 तंबाखू, अफू, चरस, गांजा यासारख्या मादक अमली पदार्थाच्या सेवनामुळे स्वत:सोबतच कुटूंबाचे पर्यायाने समाजाचे होणारे नुकसान टाळावे, असा संदेश एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने भव्य रॅलीव्दारे दिला. या रॅलीमध्ये सुमारे 90 एनसीसी मुलं-मुली सहभागी झाले होते.
26 जून  या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त फोर गर्ल्स महाराष्ट्र बटालियन आणि फोरटी सेव्हन महाराष्ट्र बटालीयनच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीला कमान अधिकारी कर्नल रवी सातपुरे यांनी झेंडी दाखवून रॅलीला मार्गस्थ केले.
नवीन कॉटन मार्केट नजीकच्या एनसीसी केंद्रातुन निघालेली ही रॅली विदर्भ महाविद्यालय, शेगाव नाका, इर्विन चौक या  मार्गाने नेण्यात आली. नशा पाणी व अमली पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या हानीची माहिती देणारे  घोषवाक्य, पोस्टर्स व बॅनर्स हातात घेऊन  एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली. या रॅलीचे विसर्जन एनसीसी केंद्रात करण्यात आले.
मादक द्रव्याच्या सतत सेवनामुळे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. आजच्या युवापिढीवर या देशाचे उज्वल भवितव्य अवलंबुन असल्यामुळे या व्यसनापासुन युवक-युवतींनी दूर रहावे. तसेच समाजातील लोकांना देखील व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कर्नल रवी सातपुरे यांनी रॅलीतील विद्यार्थ्यांना केले.
या रॅलीच्या आयोजनासाठी कॅप्टन संतोष खत्री, एनसीसी अधिकारी किरण इंगोले, पी.सी. बुरकुले, विजय नाखले, सुभेदार मेजर अशोक कुमार, महिपाल सिंह, सुभेदार आर.एस. यादव, राजकुमार, वाघमोरे, बी.एच.एम. बटालीयन हवालदार मेजर सुरेश, कंपनी हवालदार मेजर गुरमित सिंह, संजय, एस.यु. अहमद आदींनी नियोजन केले.
00000

26 जून, 2012
शासकीय ईमारतीच्या सुरक्षेचा
विभागीय आयुक्तांकडून पाहाणीव्दारे आढावा

* कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहाणी
* सर्व दस्ताऐवजांचे स्कॅन करुन संगणकीकरण
* प्रत्येक कार्यालयात अग्नीशमन यंत्र तातडीने बसविण्याचे निर्देश
* जुन्या ईमारतीचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट तातडीने करणार

अमरावती, दि. 26   शासकीय कार्यालयच्या इमारती व तेथील जीवितांच्या दृष्टीने असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहाणी आज विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी केली. यावेळी शहरातील तब्बल 11 शासकीय कार्यालयांना त्यांनी भेटी देऊन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मंत्रालय ईमारत आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व शासकीय कार्यालयांची सुरक्षीतता तपासण्यासाठी आज विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा परिषद, म्हाडा कार्यालय, महानगरपालीका, तहसिल कार्यालय, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयास भेटी देण्यात आल्या. यावेळी मनपा आयुक्त एन. नवीन सोना, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी.जी. गणवीर, अधिक्षक अभियंता (विद्युत) डी.जे. कोंडे, सदाशिव माने, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, मनपा अग्नीशमन दलाचे अधिक्षक बी.डी. पंडीत, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री. घटमाळे, उप आयुक्त रविंद्र ठाकरे, अनिल बनसोड, विशेष कार्य अधिकारी जोतिबा पाटील, सहयोगी प्रा. सुधिर राठोड, राम सिध्दभट्टी आदी या ताफ्यामध्ये होते.
सर्वप्रथम विभागीय आयुक्त कार्यालयातील संपुर्ण विभागात प्रत्यक्ष जाऊन पाहाणी करण्यात आली. या कार्यालयात सर्व फाईल्स आणि निटनेटकेपणा दिसुन आला. आयएसओ मानांकनाच्या निमित्ताने या कार्यालयातील सर्व अभिलेखे व्यवस्थित ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. यावेळी नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अजित पाटील उपस्थित होते. या ईमारतीच्या एका भागात विक्रीकर विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालतील अभिलेख कक्षाला भेट देऊन आवश्यक सुधारणा करण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात.
यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात भेट दिली असता प्रभारी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी येथील सुरक्षा व्यवस्थेची माहिती देतांना 11 अग्नीशमन यंत्र असल्याचे सांगितले. उपरोक्त सर्व कार्यालयाच्या भेटी दरम्यान प्रामुख्याने अभिलेख कक्षाची पाहाणी केली. यावेळी अभिलेख कक्षातील दस्ताऐवजांचे स्कॅन करुन त्याचे संगणीकरण करण्यात यावे, रद्दीचे विल्हेवाट लावण्यात यावी. प्रत्येक कार्यालयात अग्नीशमन यंत्र तातडीने बसुन घेण्यात यावे, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी संबंधितांना केल्यात.
म्हाडाच्या ईमारतीत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सेतू केंद्रातील अभिलेख, विभागीय कृषी सह संचालक यांच्या भांडारामधील अभिलेखांचे स्कॅनींग करुन संगणकीकरण करावे तसेच रद्दीची विल्हेवाट तातडीने लावावी, निरुपयोगी कागद जमा ठेवू नये अशा सुचना दिल्यात. दरम्यान महाराष्ट्र स्टेट               को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या कार्यालयाची पाहाणी यावेळी करण्यात आली व अभिलेखांचे दस्ताऐवज व्यवस्थित करण्याच्या सुचना दिल्यात.
सर्व ईमारतीमध्ये संकटातून बाहेर निघण्यासाठी आपतकालीन मार्ग असावा यादृष्टीने मोकळ्या खिडक्या ठेवण्यात याव्यात, कार्यालयात लाकडी कक्ष टाळावे, मोकळी आणि खेळती हवा राहील असे ईमारतीचे वातावरण असावे, खिडक्या, दरवाज्यांना पडदे ठेवू नयेत तसेच अनेक कार्यालयात जुन्या पदध्तीचे विद्युत वायरिंग आढळून आली. तिच्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, अशा सुचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नवीन प्रशासकीय ईमारत उभारण्याचा प्रस्ताव करण्यात यावा व तेथे प्रशस्त मोकळी व हवेशीर ईमारत उभारावी असे विभागीय आयुक्त यांनी यांगितले. सर्व कार्यालयाच्या परिसरात भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वे करुन त्या ठिकाणी बोअरवेल तयार कराव्यात. 

शासकीय ईमारतीच्या सुरक्षेचा . . . . .

बोअरवेलला विद्युत कनेक्शन जोडले जावे जेणेकरुन आगीसारख्या घटना तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी ते उपयोगी ठरेल. तसेच प्रत्येक कार्यालयात अग्नीशमन यंत्रासोबतच जुन्या पदध्तीप्रमाणे वाळूच्या व पाण्याच्या बादल्या सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात याव्यात, अशी सुचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.
ज्या ईमारतीला 40 वर्ष झाली असेल त्या ईमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच सर्व ईमारतीचे फायर ऑडिट तातडीने करण्यात येईल. यासाठी एक टिम तयार करण्यात येऊन त्यांच्या वतीने ही कार्यवाही झाल्यानंतर डायरेक्टर  ऑफ फायर सर्व्हिसेस यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतील.
वीज वितरण कंपनीने एक्सप्रेस फिडर बसविण्याची कारवाई शासकीय कार्यालयाच्या परिसरात तातडीने करावी. रुग्णालयाच्या परिसरात नागरिक आणि येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना तातडीने केल्या पाहिजे यासाठी अग्नीशमन यंत्राची उपलब्धता वाढवावी. या परिसरात प्रामुख्याने बोअरवेल घेण्यात यावी अशा सुचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्यात.
महापालीकेतील वाहन ठेवण्याची जागा सुरक्षीत असावी. तेथे जास्त वाहनाची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगून विभागीय आयुक्त म्हणाले, महापालीका ईमारतीच्या तळमजल्यात असलेल्या दुकानात संबंधितांना अग्नीशमन यंत्र तसेच आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात याव्यात असे श्री. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
00000

राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन
अमरावती, दि. 26   राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपआयुक्त सर्वश्री रविंद्र ठाकरे, माधवराव चिमाजी, अशोक शुक्ला, सहायक आयुक्त श्री. फडके, नाझर दिनेश बढीये, मनपा उपआयुक्त राम सिध्दभट्टी आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
            उपस्थितींनी यावेळी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000

अर्जाच्या पुनर्बांधणीसंदर्भात अडचणी असल्यास कळवावे
- मुख्य सचिव

* पुनर्बांधणीसाठी अमरावती विभागात 17 अर्ज प्राप्त
* चारा डेपोचे व्हिडीओ चित्रीकरण
* मंत्रालयात टपाल स्विकारण्यासाठी प्रत्‍येक विभागाचा विशेष कक्ष

अमरावती, दि. 26  मंत्रालय ईमारत आगीमुळे नष्ट झालेले कागदपत्राची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक पातळीवरुन कागदपत्रे मागविण्यात येत आहे. याबाबत काही अडचणी उद्भवल्यास संबंधित विभागाला कळवावे व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन मुख्यसचिव जयंत बांठिया यांनी केले.
आज मुख्य सचिव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे राज्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा तसेच अर्जाच्या पुर्नबांधणी संदर्भात विभाग व जिल्हानिहाय माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सुचना दिल्‍यात. यावेळी त्यांच्या समावेत महसुल विभागाचे प्रधान सचिव स्वाधिन क्षत्रीय, वन मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, मालीनी शंकर आदी उपस्थित होते. नागरिकांनी यासंदर्भात सेतू केंद्रात सादर केलेल्या दस्ताऐवजाच्या झेरॉक्स प्रती 30 जून पर्यंत विनामुल्य काढण्यात येतील असेही मुख्यसचिवांनी सांगितले.
अमरावती विभागात 15 जुलैपर्यंत पाणीटंचाई जाणवणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्यता आल्या आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी दिली. अर्जाच्या पुर्नबांधणी संदर्भात दोन दिवसात अमरावती विभागात एकूण 17 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच यवतमाळ येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली व आवश्यक त्या सुचना दिल्यात अशी माहिती श्री. ठाकूर यांनी मुख्यसचिवांना सादर केली. याबाबत जनजागृतीसाठी विभागात व्यापक प्रसिध्दी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील चारा उपलब्धतेबाबतची माहिती वन, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी घेतली. ज्या जिल्ह्यात चारा डेपो सुरु करण्यात आले तेथे चारा डेपोनिहाय व्हिडीओग्रॉफीव्दारे चित्रीकरण करण्यात यावे आणि लाभार्थ्याचे मनोगतसुध्दा टिपण्यात यावे, अशा सुचना श्री. परदेशी यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. लाभार्थ्यांपर्यंत चारा पोहचल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.
मंत्रालयासमोर एक शामीयाना उभारण्यात येऊन तेथे टपाल स्विकारण्यासाठी प्रत्येक विभागाचा कक्ष व कर्मचारी वर्ग ठेवण्यता आला आहे अशी माहिती महसुल विभागाचे प्रधान सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिली. पुर्नरचना कोणत्या फाईलची करावयाची याबाबतची अंतिम यादी लवकरच पाठविण्यात येणार आहे.  ही यादी सर्वांना उपयुक्त ठरेल असे सांगुन पुनर्बांधणीसाठी कर्मचारी कमी असल्यास नुकत्याच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा घ्यावी असेही श्री. क्षत्रीय यांनी यावेळी सांगितले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त एन. नवीन सोना, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, उप आयुक्त महसुल रविंद्र ठाकरे, उप आयुक्त पुनर्वसन अनिल बनसोड,  माधवराव चिमाजी आदी उपस्थित होते.
00000

25 जून, 2012
चांगल्या कामाचे अनुकरण झाले पाहिजे
- गणेश ठाकूर
अमरावती, दि. 25    विकासासाठी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यापासुन प्रेरणा घऊन त्याचे इतरांनी अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी  केले.
            यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची मुंबई येथे बदली झाल्याबद्दल त्यांना विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी श्री. ठाकूर बोलत होते.                     श्री. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे महासंचालक उदय राठोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल (अमरावती), अश्विन मुदगल (यवतमाळ), परिमल सिंह (अकोला), बी.जी.वाघ (बुलडाणा), रामचंद्र कुळकर्णी (वाशिम) व आयुक्तालयातील उपायुक्त प्रामुख्याने उपस्थित होते.
            श्री. हर्डीकर यांचे नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यात विविध विकास कामांना चांगली गती मिळाली असा उल्लेख करुन श्री. ठाकूर म्हणाले,  हर्डीकर यांची बदली झाली असली तरी त्यांच्या कामाची उणिव जिल्हाधिकारी अश्विन मुदगल भरुन काढतील. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी चांगले डॉक्युमेंट्स तयार केले आहेत. तसेच पटपडताळणीची मोहिम चांगल्या प्रकारे राबविली. कामाचे नियोजन आणि ते पूर्ण करण्यासाठी कौशल्य श्री. हर्डीकर यांच्याकडे आहे. त्यामुळे ते कुठल्याही क्षेत्रात असले तरी आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटवतील असा विश्वास श्री. ठाकूर यांनी व्यक्त केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी श्रावण हार्डीकर यांचा विभागीय आयुक्त याच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना श्री. हर्डीकर म्हणाले, लोकांचे प्रश्न अनेक आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. यवतमाळ येथे जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह सर्व अधिकाऱ्यांची चमु चांगली असल्यामुळे त्या ठिकाणी विकास कामे करण्या साठी वाव मिळाला. तसेच विभागीय आयुक्त गणेश ठाकूर व  वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे कामामध्ये यश मिळाले. यवतमाळ येथून बदली झाली असली तरी केमच्या माध्यमातून सर्वांशी संबंध कायम राहणार आहेत. आणि आपल्या सहकार्यामुळेच चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल असे श्री. हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांसमवेत ग्रामीण भाषेत संवाद साधण्याची कला श्रावण हर्डीकर यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न ते आस्थेने सोडवित, असे मत श्री. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे महासंचालक उदय राठोड यांनी यावेळी व्यक्त केले. व श्री. हर्डीकर यांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, अश्विन मुदगल, बी.जी. वाघ, रामचंद्र कुळकर्णी परिमल सिंह यांनी श्री. हर्डीकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व असुन त्यांची कार्यपध्दत सर्वांसाठी अनुकरणीय आहे असे मत व्यक्त केले. यावेळी उप आयुक्त अनिल बनसोड, अशोक शुक्ला, रविंद्र ठाकरे, श्रीकांत फडके यांनीही आपले विचार मांडले व श्री. हर्डीकर यांना शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन तहसिलदार मोहन जोशी यांनी केले. उप आयुक्त माधवराव चिमाजी यांनी उपस्थितांचे आभार मानले .
00000

1 जुलै पासुन ऑटोरिक्षा चालाकांना
इलेक्ट्रॉनिक्स मिटर बसविणे सक्तीचे

अमरावती, दि. 25   राज्यात सर्वत्र ऑटोरिक्षा चालाकांना दिनांक 1 जुलै, 2012 पासुन इलेक्ट्रॉनिक्स डिजीटल भाडे मिटर बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. जुन्या नोंदणी झालेल्या परवान्यावरील ऑटोरिक्षांना दिनांक 1 जुलै, 2012 पासुन ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण होईल तेव्हापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मिटर बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे.
            महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 140 व्यतिरिक्त ऑटोरिक्षा इलेक्ट्रॉनिक्स मिटर तांत्रित समितीने सुचविलेल्या/चाचण्या यशस्वीरित्या पार पडलेल्या  इलेक्ट्रॉनिक्स भाडे मोटार उत्पादकांव्दारे मीटर पुरविण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती यांनी प्रसध्दिपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
24 जून, 2012
 सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीचे  तातडीने
फायर ऑडीट करा
- विभागीय आयुक्त

अमरावती ‍‍दि. 24   अचानक लागणारी आग अथवा कोणत्याही आपत्तीमुळे जिवित हानी तसेच इमारतीचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल व फायर ऑडीट तातडीने करण्यात  यावे, असे  निर्देश विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी विभागातील जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिका-यांना  दिलेत.
       मुंबई येथे 21 जून रोजी मंत्रालयात लागलेल्या आकस्मीक आगीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त ठाकूर यांनी
विभागातील शासकीय इमारतीच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेतला. या बैठकीला  विभागातील जिल्हाधिकारी राहूल रंजन  महिवाल (अमरावती) ,  परिमल  सिंह ( अकोला), बी.जी. वाघ (बुलडाणा) , अश्विन  मुदगल
(यवतमाळ) , रामचंद्र कुळकर्णी (वाशिम) , अधिक्षक अभियंता सदाशिव माने , श्री मस्के ,प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्रालय आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या बैठकीचे  आयोजन केले असल्याचा उल्लेख करुन विभागीय आयुक्त म्हणाले, कार्यालयातील नस्ती, कागदपत्र सुरक्षीत  राहण्यासाठी फायरप्रुफ कपाट घ्यावे इमारतीचे विद्युतीकरण फार जुने असल्यास त्याचे नूतनीकरणाची कार्यवाही  बांधकाम विभागाच्या  विद्युत   शाखेकडून करावी. कार्यालयातील निकामी  कागदपत्र वा रद्दीची विल्हेवाट लावावी अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
                अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ , बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती ब्रिटीश कालीन आहेत. या इमारती काल बाह्य झाल्या असल्यास तेथे  नविन इमारती बांधण्याचा प्रस्ताव करावा. अमरावती येथील जिल्हा न्यायालय इमारतीच्या धर्तीवर नवीन इमारतीचा प्लॅन करावा. तसेच ज्या कार्यालयाच्या इमारती कालबाह्य असतील त्यांनी देखील नविन इमारतीसाठी प्रस्ताव करावे, असे श्री. ठाकूर यांनी सांगितले .
     विभागातील सर्व शासकीय कार्यालयांनी कार्यालयाच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अग्नी शमन यंत्राची मागणी नोंदवावी व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व शासकीय इमारतीची  पुन्हा तपासणी करावी व आवश्यकतेनुसार सर्व दुरुस्ती करावी. कार्यालयाचा विज पुरवठा कमी अधिक दाबाने होत असल्यास धोका निर्माण होऊ शकतो  हा धोका टाळण्यासाठी एक्सप्रेस फिडर
बसविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्यात. कार्यालयाच्या इमारतीवर अचानक विज कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी विद्युत रोधक लावण्यात यावे, असे सांगितले.
कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. एका कार्यालयातुन किमान दोन कर्मचा-यांना असे सर्व कार्यालयातील कर्मचा-यांना डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्यावतीने  प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे निर्देशही श्री. ठाकूर यांनी दिले.
या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल  महिवाल म्हणाले,  जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत खुप जुनी आहे. जुने लाकडी फर्निचर आहे . त्यामुळे सुरक्षेच्या दृष्‍टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. आश्विन मुदगल म्हणाले, यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे फायर ऑडीटीची प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे. कारण ही इमारत ब्रिटीश काळातील असून कार्यालयाचा विस्तार झाला त्यामुळे येथे इमारतीची गरज आहे, असे सांगितले. तहसिल एसडीओ कार्यालयात सर्व अभिलेखाचे स्कॅनिंग करण्याची गरज असून हे अभिलेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता असल्याचे बुलडाण्याचे जिल्हाधिकारी बी.जी.वाघ यानी सांगितले. अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी दुरुस्ती निधी आवश्यक आहे. तसेच बांधकाम  विभागाकडून फायर ऑडीट होणे आवश्यक असे, जिल्हाधिकारी परिमल सिंह  यानी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व कार्यालयाची तपासणी झाली पाहिजे तसेच एसडीओ तहसिल कार्यालयात दर एक दोन महिन्यात आढावा घेतला पाहिजे असे मत वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी व्यक्त केले .
                या बैठकीत सार्वजनिक अधिक्षक अभियंता सदाशिव माने, श्री मस्के, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी बैठकीत माहिती दिली.
या  बैठकीला उपआयुक्त (पुनर्वसन) अनिल बनसोड, उपआयुक्त (सामान्य) माधवराव चिमाजी, उपआयुक्त (विकास) अशोक शुक्ला, उपआयुक्त (महसूल) रविंद्र ठाकरे , सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

******

मंत्रालयीन आगीत नष्ट फाईल्स  नव्याने तयार करण्यासाठी
युध्दपातळीवर काम सुरु करावे
- जिल्हाधिकारी

अमरावती दि. 24    मंत्रालयीन  इमारतीला 21 जून 2012 रोजी लागलेल्या आगीत सर्व  सामान्य नागरिकांसी निगडीत फाईल्स  जळून नष्ट झाल्या आहेत. अशा  सर्वप्रकरणाच्या  फाईल्स नव्याने तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु  करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी केले.
ज्या नागरीकोची अशी प्रकरणे मंत्रालयात  निर्णयासाठी पाठविले आहेत.  त्यांनी संबंधित प्रकरणाची त्याच्या जवळ असलेली पोच, अर्जाची प्रत अथवा सलग्न कागदपत्रे त्या त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालात जमा करावीत. यासाठी तालुका स्तरावरील  सेतू सेवा केंद्रात विशेष कक्ष उघडयात आले आहे. सामान्य जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वसंबंधित नागरीकांनी व लोकप्रतिनिधीनी या कामी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाहरी  राहूल रंजन महिवाल यांनी  केले आहे.
            मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचे कार्यालयातील  फाईल्स, आदिवासी विकास विभाग, पशुसंवर्धन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सांस्कृतीक कार्य विभाग, गृह विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, पर्यावरण, पर्यटन सामान्य प्रशासन विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य सचिवाचे कार्यालय, नगरविकास, महसुल, मदत व पुनर्वसन, जलसंधारण, योजना संबंधिची फाईल आगीत पुर्णपणे नष्ट झालेले आहेत. गृह विभागातील तुरुंगे व न्यायालयीन चौकशी  विभागातील कागदपत्रे नष्ट झाली आहेत. परिवहन विभागातील राजपत्रित अधिका-याची आस्थापना तसेच उर्जा विभाग व रोजगार हमी योजना  विभागातील अभिलेख नष्ट झाले आहेत.
            सर्व संबंधित नागरीकांनी मत्रालयीन स्थरावर प्रलंबित असलेल्या  त्यांच्या प्रश्नाबाबतच्या  सचिकांची पुनबांधनी करण्यासाठी त्याच्या जवळील सर्व कागदपत्राच्या  प्रती संबधित सेतू केंद्रात  जमा कराव्यात सर्व विभागा करिता तहसिल स्तरावर, तहसिलदार, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त  यांना समन्वय  अधिकारी  म्हणून शासनाने घोषित केलेले आहे असेही जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी सांगितले. तसेच  अधिकारी व कर्मचा-याची मंजूर झालेली रजा रद्द करावी असे  शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. दिनांक  9 जुलै 2012 पासून पावसाळी अधिवेश वेळेवर सुरु होणार असल्याचे  जिल्हाधिकारी  राहूल रंजन महिवाल यांनी शेवटी सांगितले.
            या बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, अप्पर जिल्हाधिकारी  जितेन्द्र पापळकर , अति.मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम.अहमद, सा.बा.विभागाचे कायकारी अभियंता प्रशांत पाटील, मनपाचे उपआयुक्त रामसिध्दभट्टी उपआयुक्त रमेश मवाशी, उपविभागीय अधिकारी  मोहन पातुरकर, व संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते.
00000

आगीत नष्ट झालेल्या नस्तीच्या पुनर्बाधणीसाठी
कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करा
- गणेश ठाकूर

            अमरावती दि. 24    21 जून रोजी  मंत्रालय इमारतीच्या आगीत विविध विभागाच्या नष्ट झालेल्या  नस्तीची पुनर्बांधणी करण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मंत्रालयीन विभागाला लागणारी आवश्यक माहिती व कागदपत्रे संबंधितांनी तातडीने उपलब्ध करुन द्यावी असे निर्देश विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी दिले.
आज विभागीय आयुक्त श्री ठाकूर यांनी   विभागस्तरीय अधिका-याची आढावा बैठक घेतली यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. या बैठकीला महापालिका आयुक्त  एन नवीन सोना, पोलिस उपआयुक्त सुनिल साखरे, उपआयुक्त (पुर्नवसन ) अनिल बनसोड, उपआयुक्त (महसूल) रविंद्र ठाकरे, माधवराव चिमाजी, प्रामुख्याने उपस्थित होते.
             मंत्रालयाच्याआग प्रकरणामुळै  सर्व विभागाच्या अधिका-यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.  मंत्रालयीन  विभागाचे काम  लवकर सुरळीत सुरु होण्याच्या दृष्टीने  जे अधिकारी, कर्मचारी रजेवर असतील त्यांच्या  रजा रद्द करुन कामावर परत बोलाविण्यात यावे.अशा सुचनाही  विभागीय आयुक्तांनी दिल्या. 
या आगीमध्ये नगरविकास, महसूल, मदत व पुनर्वसन, वने,  गृह पर्यटन, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, सामान्य प्रशासन, उर्जा, जलसंधारण आदिवासी विकास मंत्री कार्यालय, पर्यावरण मंत्री कार्यालय, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विभाग, अपारंपारीक उर्जा मंत्री कार्यालय, गृहनिर्माण राज्यमंत्री कार्यालय, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री कार्यालय, सास्कृतिक  राज्यमंत्री कार्यालय, उच्च व  तंत्रशिक्षण  राज्यमंत्री कार्यालय, पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य राज्यमंत्री कार्यालय, पर्यावरण राज्यमंत्री कार्यालय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री कार्यालय तसेच माननीय मुख्यमंत्री कार्यालय, मा. उपमुख्यंत्री कार्यालय, मा. मुख्य सचिव कार्यालयातील बहुतांश संचिका कागदपत्रे नष्ट झालेली आहे. तर  महसुल विभागातील कुळ कायद्याची प्रकरणे, महसुल  भुमी अपिल प्रकरणे, नायब तहसिलदार आस्थापना, तालुका पुनृर्रचना, गौणखनीज प्रकरणे व कृषक प्रकरणा बाबतची प्रकरणे सुरक्षित आहेतअसे  श्री ठाकुर यांनी या बैठकीत सांगितले.
नुकसान झालेल्या  नगरविकास विभागातील यु.याय.डी.एस.एम.टी व  नगरोत्थान योजना संबंधिची दोन्ही कार्यसने आगीत पुर्णपणे नष्ट झालेली आहे. गृह विभागातील तुरुंग व न्यायालयीन चौकशी विभागातील कागदपत्रे, परिवहन विभागातील राजपत्रित अधिका-याची आस्थापना तसेच  उर्जा विभाग व रोजगार हमी विभागातील अभिलेख नष्ट झाली आहे. वन विभाग,   मदत व पुनर्वसन विभागातील अभिलेख्याचे अंशत:   नुकसान झाले आहेत. या विभागाची कागदपत्रे मंत्रालयाला उपलब्ध करण्यासाठी संबंधितांनी  तातडीने कार्यवाही करावी यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे असे  श्री ठाकुर यांनी सांगितले
मंत्रालयीन विभागाला सादर करण्यात येणा-या प्रकरणाची संख्या  व  जी कागदपत्रे पाठविण्यात येतील याची यादी  संबंधितांनी  ठेवावी व कागदपत्रे  पाठविल्यच्या  अहवालाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावी  अशा सुचनाही  विभागीय आयुक्तांनी  यावेळी दिल्या.
सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीची  सुरक्षा  बळकट करण्यासाठी  सर्वस्तरावरुन प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगून  श्री ठाकुर यांनी  सर्व शासकीय इमारतीचे  जिल्हा निहाय प्लॅन स्कॅन करुन  शासनाला  माहिती  सादर करावी तसेच  इमारतीचे फायर ऑडीट, स्ट्रक्चर  ऑडीट तातडीने करुन इमारतीत आगप्रतिबंधक उपाय योजना  कराव्यात असे श्री ठाकूर यांनी सांगितले.
नागरीकांना मंत्रालयात एक आठवडा प्रवेश  नाही
मंत्रालयातील कोणत्याही कामासाठी  नागरीकांना  मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही असे मुख्य सचिव जयंत बाँठिया यानी सर्व अधिका-यांना  सागितले.  त्यामुळे नागरीकांनी मंत्रालयात जाऊ  नये असे आवाहन विभागीय आयुक्तांनी  केले आहे.
या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त  एन नविन सोना यांनी  फायरसेप्टी  ॲन्ड प्रिपर्डनेस बाबत सादरीकरण केले. यावेळी त्यांनी  महाराष्ट्र सिर्व्हिस   वेपसाईटची माहिती दिली. फायरसेप्टी  ऑडीट आदि बाबत तपशिलवार  माहिती  देऊन कार्यालयातील  आगीसारख्या घटना नियंत्रीत करण्यासाठी  घ्यावयाची काळजी  याबद्दल श्री सोना यांनी माहिती दिली. सर्व कार्यालयाच्या परिसरात भूजल सर्व्हेक्षण विभागाने बोअरवेल करण्यासाठी सर्व्हे करावा  शासकीय कार्यालयातील विद्युत दाब पुरवठा तपासण्यात यावा इलेक्ट्रीकल्स ऑडीट करुन  आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सुचना विभागीय आयुक्त श्री  ठाकूर यांनी दिल्या. प्रत्येक कार्यालयात  अग्निशमनसाठी  नोडल ऑफीसर नेमण्यात यावा  त्याला प्रशिक्षण दिल्या जाईल  इमारतीमध्ये इमर्जन्सी अलारम बसविण्यात यावा असे  एन नविन सोना यांनी सांगितले.
या बैठकीला   सहसंचालक लेखा व कोषागारे सुनिल  अयाचित,  अधिक्षक कृषि अधिकारी र.चि जाधव, परिवहन विभागाचे स.प  जगताप, पोलिस विभागाचे श्री  पा. कुळकर्णी, शिक्षण मंडळाचे  विभागीय सचिव प्रदिप अभ्यंकर, क्रिडा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, इतर सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                        *****